Wednesday, March 26, 2008

ज्वारीची काढणी अंतिम टप्प्यात

आसू, ता. २६ - फलटणच्या पूर्व भागातील शेतकरी गहू, हरभरा, ज्वारी आदी पिकांच्या मळणीत व्यस्त आहेत. ज्वारीची मळणी अंतिम टप्प्यात आली असून, गहू- हरभऱ्याच्या मळणीने गती घेतली आहे.पूर्व भागातील आसू, पवारवाडी, गोखळी, राजाळे, शिंदेनगर भागात पावसाने चांगलीच हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांचे रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले. सुसाट वाऱ्यामुळे कित्येकांचे गव्हाचे पीक भुईसपाट झाले आहे. काढून पडलेल्या हरभरा, गव्हाचे पीक पावसाने भिजल्याने गहू पांढरे पडणे, काळसर होणे, तसेच हरभरा भिजल्याने बेचव होत आहे, तसेच त्याचा ठसठसीतपणा निघून जात असल्याने बाजारपेठेतील याची मागणी कमी होणार असल्याचे शेतकरी सांगतात.

शेतातील उभ्या गव्हाची मळणी शेतकरी सकाळपासून दुपारपर्यंतच्या कडक उन्हात हार्वेस्टरच्या साहाय्याने लगबगीने करत आहेत. गव्हाला यंदा उतारा चांगला असून, एकरी १८ ते २० पोती एवढा उतारा पडत आहे. मळणीसाठी हार्वेस्टर एकरी ८००, तर पोत्याला ७० रुपये दर आहे. ढगाळ हवामानामुळे शेतकऱ्यांच्या सुगीला आसू परिसरातून गती आली आहे.

No comments: