Wednesday, March 26, 2008

राजकीय छावण्या बंद होणे गरजेचे - चिमणराव कदम

फलटण, ता. २५ - फलटण तालुक्‍यातील राजकीय गटांच्या छावण्या जोपर्यंत बंद होत नाहीत, तोपर्यंत तालुक्‍याचा विकास होणार नसल्याचे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते चिमणराव कदम यांनी सांगितले. श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीच्या निमित्ताने मतदारांचे आभार मानण्यासाठी महाराजा मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या मेळाव्यात श्री. कदम बोलत होते. पालकमंत्री आणि श्रीराम कारखान्याच्या सत्तारूढ गटाचे सर्वेसर्वा रामराजे नाईक- निंबाळकर यांचे राजकीय शत्रू म्हणून आपण कारखान्याची निवडणूक लढविली नाही, तर रामराजे यांनी कारखाना नीट चालविला नाही, त्याचबरोबर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य प्रकारे न्याय दिला नसल्याने शेतकऱ्यांचे हित डोळ्यांपुढे ठेवून आपण निवडणुकीत उतरलो होतो, असे स्पष्ट करून श्री. कदम म्हणाले, ""शेतकरी कामगार पॅनेलच्या उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले असले, तरी पराभवाने खचून जाणाऱ्यांपैकी आपण नाही. तालुक्‍यातील चार हजार ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्याला मते दिली आहेत. म्हणजे त्यांची आपल्याला साथ आहे.''

तेव्हा मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि सहकारमंत्री पतंगराव कदम यांच्याशी चर्चा करून नव्याने खासगी कारखाना उभारण्याबाबत आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कारखान्याच्या निवडणुकीतील उमेदवार निश्‍चितीच्या तोंडावर शेतकऱ्यांशी गद्दारी करून माजी खासदार हिंदूराव नाईक- निंबाळकर, प्रल्हाद साळुंखे- पाटील आणि तेजराज पवार हे तिघेही आपल्या गटातून बाहेर पडले. परिणामी विश्‍वासघात केला. तेव्हा शेतकऱ्यांनी त्यांना माफ करूच नये, असे आवाहनही त्यांनी केले.

मेळाव्यात सुरेश पवार, पोपटराव काकडे, साहेबराव जाधव, ऍड. नरसिंह निकम, डॉ. त्रिपुटे यांची भाषणे झाली. कारखान्याच्या निवडणुकीत सत्तारूढ गटाकडून बोगस मतदान आणि पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर झाल्याचे काही वक्‍त्यांनी निदर्शनास आणून दिले.

No comments: