Tuesday, March 18, 2008

फलटण कारखाना - "श्रीराम' राजे गटाकडेच

फलटण, ता. १८ - विरोधकांचे सत्तांतराचे मनसुबे धुळीस मिळवीत राजेगटाच्या श्रीराम पॅनेलने श्रीराम कारखान्याची सत्ता पुन्हा अबाधित ठेवली. आज रात्री साडेनऊपर्यंत जाहीर झालेल्या चौदा जागा पालकमंत्री रामराजे नाईक निंबाळकर आणि विद्यमान अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील श्रीराम पॅनेलने जिंकल्या होत्या. यापूर्वी बिनविरोध निवडून आलेले दोन्हीही सदस्य राजेगटाचे असल्याने १६ जागांवर श्रीराम पॅनेलने वर्चस्व मिळविले होते. चिमणराव कदम यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी कामगार पॅनेलला एकही जागा मिळाली नव्हती. रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती.

कारखान्यासाठी १६ मार्च रोजी मतदान झाले होते. मतमोजणी आज सकाळी आठ वाजल्यापासून कारखान्याच्या कल्याण आणि क्रीडा मंडळाच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी सौ. रेश्‍मा माळी आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कैलास जेबले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली. पहिल्या टप्प्यात अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघाची मतमोजणी झाली. त्यामध्ये श्रीराम पॅनेलचे गणपत नारायण बेंद्रे (५४७५ मते) यांनी आपले विरोधक वसंत आवबा रणदिवे (३८८०मते ) यांच्यावर १५९५ मतांनी मात केली. विमुक्‍त जाती व भटक्‍या जमाती मतदार संघात बाळासाहेब भानुदास खटके (५५१२) यांनी आपले प्रतिस्पर्धी भगवान हरी खुरंगे (३८३९) यांचा १६८३ मतांनी पराभव केला. महिला प्रतिनिधी मतदारसंघातील दोन जागांसाठी तीन महिला उमेदवार होत्या. त्यापैकी राजेगटाच्या श्रीराम पॅनेलमधील सौ. सुरेखादेवी कृष्णराव कदम (५३७५) आणि सौ. जिजाबाई भिवा पोकळे (५४४०) या दोघी विजयी झाल्या.

इतर मागासवर्ग मतदारसंघात विरोधी गटाचे ऍड. साहेबराव सखाराम जाधव (४१२०) यांचा डॉ. बाळासाहेब पंढरीनाथ शेंडे (५२५४) यांनी ११३४ मतांनी पराभव केला. सर्वसाधारण "अ' गट मतदारसंघापैकी होळ-गिरवी गटातून सत्तारूढ गटाचे संपतराव नामदेवराव कदम (५२७६) वसंतराव मारुतराव गायकवाड (५२१६) आणि नितीन शाहूराजे भोसले (५२४६) या तिघांनीही आपल्या विरोधकांचा पराभव केला. जिंती राजाळे गटातून सत्तारूढ गटाचे परशुराम रामचंद्र तावरे (५५२५), शरद विश्‍वासराव रणवरे (५२६१) आणि रामचंद्र बापूराव सोडमिसे (५२२६) विजयी झाले.

मतमोजणी सुरू झाल्यानंतर कारखाना परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते. विजयी उमेदवारांची नावे जाहीर होताच त्यांचे समर्थक आणि कार्यकर्ते गुलालाची मोठ्या प्रमाणात उधळण करीत विजयाचा आनंद मिळवीत होते.

श्रीराम कारखान्याच्या निवडणुकीतील संचालकांची संख्या २२ होती. त्यापैकी "ब' वर्ग सामान्य किंवा बिगर उत्पादक सभासद मतदारसंघातून सुखदेव महादेव बेलदार यांची आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रतिनिधी मतदारसंघातून चंद्रकांत दत्ताजीराव पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. आतापर्यंतच्या परिस्थितीवरून २२ पैकी १३ जागेवर राजेगटाने निर्विवाद वर्चस्व मिळविल्याचे सिद्ध झाले आहे. जाहीर निकालामध्ये विरोधकांना एकाही जागेवर विजय मिळविता आलेला नव्हता

No comments: