Tuesday, April 1, 2008

"राष्ट्रवादी'ला झटका "किसन वीर' मदन भोसलेंकडेच!

सातारा, ता. १ - किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार मदन भोसले यांच्या शेतकरी विकास पॅनेलने २१ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळविले. ....
विरोधी राष्ट्रवादी पुरस्कृत सहकार पॅनेलला एका जागेवर समाधान मानावे लागले. पहिल्यापासूनच शेतकरी पॅनेलच्या उमेदवारांनी चार हजार मतांची आघाडी घेऊन विजयावर शिक्कामोर्तब केला. सभासदांनी आमदार मदन भोसले व संचालक मंडळाच्या कार्यावर विश्‍वास दाखवत सत्ता त्यांच्याच ताब्यात सुपूर्द केली.

पहिल्यापासून चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीच्या निकालासाठी आज वाई येथील औद्योगिक वसाहतीतील श्रीनिवास मंगल कार्यालयात मतमोजणी झाली. सकाळी साडेआठ वाजता मतपत्रिकांची गटनिहाय विभागणी करून २५ चे गठ्ठे करण्यात आले. दुपारी साडेबारा वाजता मतमोजणीस सुरवात झाली. प्रथम राखीव मतदारसंघाची मतमोजणी घेण्यात आली. पहिला निकाल एकच्या दरम्यान जाहीर झाला. यामध्ये सत्तारूढ गटाच्या शेतकरी विकास पॅनेलचे अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातील उमेदवार गणपत खंकाळ विजयी झाले. त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी संजय कांबळे यांचा ३,९८३ मताधिक्‍याने पराभव केला. निकाल जाहीर होताच मतमोजणी केंद्राबाहेर उपस्थित शेतकरी विकास पॅनेलच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषास सुरवात केली. आमदार मदन भोसलेंच्या नावाच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर दुसरा निकाल सोसायटी मतदारसंघाचा जाहीर झाला. त्यामध्ये सहकार पॅनेलचे रतनसिंह शिंदे विजयी झाले. त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी मानसिंग शिंगटे यांचा ७५ मतांनी पराभव केला. त्यानंतर विमुक्त जाती, भटक्‍या जमाती मतदारसंघातील निकाल जाहीर झाला. त्यामध्ये शेतकरी पॅनेलचे चंद्रकांत काळे यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी हणमंतराव चवरे यांचा ४१९० मताधिक्‍याने पराभव केला. इतर मागास प्रवर्गातील शेतकरी पॅनेलचे लालसिंग जमदाडे विजयी झाले. त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी सहकार पॅनेलचे अमर जमदाडे यांचा चार हजार २५ मताधिक्‍याने पराभव केला.

आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गातील शेतकरी पॅनेलचे नंदकुमार निकम विजयी झाले. त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी सुधीर कदम यांचा चार हजार ९२ मतांनी पराभव केला. त्यानंतर महिला राखीव मतदार संघाची मतमोजणी झाली. त्यामध्ये शेतकरी पॅनेलच्या सौ. सुनंदा चव्हाण व रंजना फाळके विजयी झाल्या. सायंकाळी सहानंतर ऊस उत्पादक सभासद मतदारसंघाची मतमोजणी सुरू झाली. त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह अधिकच ताणला होता. सुरवातीला कोरेगाव व सातारा गटाची मतमोजणी घेण्यात आली. पहिल्या निकालाप्रमाणेच या गटांच्या निकालातही शेतकरी विकास पॅनेलचे उमेदवार विजयी ठरले. कोरेगावमधून प्रभाकर बर्गे, किसन कदम आणि घनश्‍याम साळुंखे हे शेतकरी पॅनेलचे उमेदवार विजयी झाले. सातारा गटातून विद्यमान संचालक चंद्रकांत इंगवले, बाबासाहेब कदम, आनंदराव जाधव हे विजयी झाले. त्यानंतर वाई-बावधन-जावळी गटाची मतमोजणी झाली. त्यामध्ये शेतकरी पॅनेलचे शिवाजी गायकवाड, रोहिदास पिसाळ आणि अशोक मोरे विजयी झाले. भुईंज गटातून विद्यमान संचालक नारायण पवार, विद्यमान अध्यक्ष मदन भोसले, उपाध्यक्ष गजानन बाबर विजयी झाले. सर्वांत शेवटी कवठे-खंडाळा गटाची मोजणी झाली. त्यात खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे चिरंजीव आणि पॅनेलप्रमुख मकरंद पाटील यांना पराभवाचा धक्का बसला. या गटातील हणमंत पिसाळ, संदीप पोळ आणि सुभाष साळुंखे हे शेतकरी पॅनेलचे उमेदवार विजयी झाले. निकाल जाहीर होताच सातारा व कोरेगाव तालुक्‍यांत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. कोरेगावात विजयी मिरवणूक काढण्यात आली.

.................................................
प्रमुख पराभूत
मकरंद पाटील, अरविंद कदम, अरुण माने, हंबीरराव जाधव, अविनाश धायगुडे पाटील, दौलतराव साळुंखे, शशिकांत पिसाळ, राजेंद्र शिंदे

.................................................
प्रमुख विजयी
मदन भोसले, गजानन बाबर, नारायण पवार, प्रभाकर बर्गे, बाबासाहेब कदम, आनंदराव जाधव, चंद्रकांत इंगवले, हणमंतराव पिसाळ, सौ. सुनंदा चव्हाण, घनश्‍याम साळुंखे
.................................................

No comments: