Wednesday, March 26, 2008

कंटेनर उलटून तीस लाखांचे नुकसान

फलटण, ता. २५ - पुणे- पंढरपूर मार्गावर नीरा उजवा कालव्यावर असलेल्या राऊ रामोशी पुलाच्या वळणावर सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांतून द्राक्ष भरून आलेला कंटेनर पलटी झाल्याने तीस लाख रुपयांचे नुकसान झाले. याबाबत अधिक माहिती अशी - तासगाव (जि. सांगली) आणि पंढरपूर परिसरातून अंदाजे १५ टन निर्यातक्षम द्राक्षे व्यापाऱ्यांनी खरेदी करून कंटेनरमध्ये भरली व त्यानंतर कंटेनर संबंधित व्यापारी आणि एजंट यांनी सील केला. रात्री ११ च्या दरम्यान पंढरपूर येथून मुंबईकडे निघालेला कंटेनर (एमएच ०४ बीजी २५९५) रात्री दोन वाजण्याच्या सुमारास फलटणनजीकच्या नीरा उजव्या कालव्यावरील राऊ रामोशी पुलाजवळ आला. मात्र, त्या वेळी रस्त्याचा अंदाज न आल्याने कंटेनर वळण घेताना झोला बसून पलटी झाला. मध्यरात्री घटना घडली असल्याने परिसरातील नागरिकांना व पोलिसांना कंटेनर पलटी झाल्याची माहिती त्वरित समजली नाही. मात्र, या घटनेत जखमी झालेल्या चालकांनी दूरध्वनीद्वारे पोलिसांशी संपर्क साधला. पलटी झालेल्या कंटेनरमधील अंदाजे १५ टन द्राक्षे विविध व्यापाऱ्यांनी खरेदी केलेली असल्यामुळे मुंबईला द्राक्षे घेऊन जाणारा कंटेनर नेमका कोणत्या कंपनीकडे जाणार आहे, हे समजू शकले नाही. या घटनेत कंटेनरचा चालक सल्लाउद्दीन सहा व क्‍लीनर अल्लाउद्दीन सहा हे दोघे भाऊ जखमी झाले जखमींना प्राथमिक उपचारासाठी फलटणच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महाड- पंढरपूर रस्त्यावरील फलटणनजीकच्या नीरा उजव्या कालव्यावरील राऊ रामोशी पूल आणि त्याच्या दोन्ही बाजूची काटकोनातील वळणे याठिकाणी नेहमी अपघात होत असतात. गेल्या महिन्यातही सांगोल्याहून अंदाजे तीन लाख रुपये किमतीची डाळिंबे घेऊन जाणारा ट्रक अशाच पद्धतीने पुलाच्या दक्षिणेकडील वळणावर पलटी झाल्याने संबंधित शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. संबंधित मार्गावर रात्रंदिवस मोठ्या प्रमाणात सर्व प्रकारची वाहतूक असल्याने पुलावरील कठडे आणि पुलाच्या दोन्ही बाजूंच्या वळणावर बांधकाम विभागाने सुरक्षित कठडे उभारावेत, अशी मागणी वारंवार केली जात आहे. मात्र, त्याकडे संबंधित विभागाकडून दुर्लक्ष होत आहे.

No comments: