Wednesday, November 26, 2008

जिल्ह्यात आणखी एक "मेगा प्रोजेक्‍ट'

सातारा, ता. २५ - इलेक्‍ट्रॉनिक पार्क, बेस्टचा बायोमास वीजनिर्मिती प्रकल्प, परी ऑटोमेशन सिटी आणि आता भूगर्भातील तेल शोधणारी यंत्रणा विकसित करणारा प्रकल्प... खंडाळा तालुक्‍यात सेझअंतर्गत हा आणखी एक मोठा प्रकल्प येऊ घातला आहे. केसुर्डी येथे २५ हेक्‍टरवर होणाऱ्या या प्रकल्पासाठी दोन कंपन्या ५०० कोटींची गुंतवणूक करणार आहेत. त्यातून सुमारे ८०० जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. स्क्‍लंबर इंडिया टेक टॉनटन प्रायव्हेट लिमिटेड आणि वेस्टर्न जेको इंडिया मॅन्युफॅक्‍चरिंग प्रायव्हेट लिमिटेड या दोन कंपन्या प्रत्येकी अडीचशे कोटींची गुंतवणूक या प्रकल्पात करणार आहेत. भूगर्भातील तेल शोधणाऱ्या यंत्रणेचे त्यात उत्पादन होणार आहे. समुद्रात व जमिनीवरून भूगर्भातील तेल शोधणारी यंत्रणा, त्यासाठी लागणारी केबल, सेन्सॉर आदींची निर्मिती येथे होणार आहे. याबाबतच्या प्रस्ताव औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) व एमटीडीसी यांच्याकडून मंजूर झाले आहेत. सध्या या प्रकल्प उभारणीचे काम सुरू असून, येत्या वर्षभरात तो पूर्ण होईल. आतापर्यंत खंडाळा तालुक्‍यातील शिरवळ व केसुर्डी येथे इलेक्‍ट्रॉनिक्‍स पार्क, ऑटोमेशन सिटी, तसेच बेस्टचा बायोमासपासून वीजनिर्मिती हे प्रकल्प आलेले आहेत. यामध्ये भूगर्भातील तेल शोधणारी यंत्रणा बनविणाऱ्या या प्रकल्पाची भर पडली आहे. सेझअंतर्गत येणाऱ्या या "मेगा प्रोजेक्‍ट'मुळे खंडाळा तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे. आजपर्यंत जिल्ह्यातून काही उद्योग बाहेर गेल्याने औद्योगिक वसाहतीतील वातावरण दूषित झाले होते. मात्र, आता वातावरण पुन्हा बदलण्यास सुरवात झाली असून, जिल्ह्यातील स्थानिक लघुउद्योजकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. सेझअंतर्गत मोठी गुंतवणूक केसुर्डी येथे एकूण ३३० हेक्‍टरवर सेझ विकसित होत आहे. १५ मोठे प्रोजेक्‍ट येणार आहेत. यामध्ये परी ऑटोमेशन सिटीचा समावेश असून, त्यात २५८ कोटींची गुंतवणूक होणार आहे. १२०० जणांना रोजगार मिळणार आहे. शिरवळ येथील इलेक्‍ट्रॉनिक पार्कमध्ये ५० कोटींची गुंतवणूक होणार असून, ५०० जणांना रोजगार मिळणार आहे. याशिवाय केंद्राने जिल्ह्यात मेगा फूड पार्कला मंजुरी दिली आहे. लोणंद येथील बायोमास वीजनिर्मिती प्रकल्पात ९० कोटींची गुंतवणूक होणार आहे.

No comments: