Wednesday, October 22, 2008

फलटणमध्ये भर बाजारपेठेत तलवारीने वार करुन एकाची हत्या

फलटण- शहरातील बाजारपेठेत बुधवारी (ता. २२) सकाळी ११ च्या सुमारास सुरेश पवार (वय ४९) या खजूर विक्रेत्याचा तलवारीने वार करून खून झाल्याने खळबळ माजली.

या घटनेनंतर शहरातील बाजारपेठ बंद करण्यात आली. नेहमीप्रमाणे सर्व व्यवहार सुरळीत सुरू असताना शहरातील शिवाजी पुतळ्याजवळील हॉटेल अतिथीसमोरील रस्त्यावर हा प्रकार घडला. पवार यांच्या पुतण्यावरही तलवारीने वार करण्यात आले. या हल्ल्यात तोही गंभीर जखमी झाला आहे.

या घटनेचे कारण अजून समजू शकले नाही.

Sunday, October 19, 2008

"न्यू फलटण'चा आदर्श इतर कारखान्यांनी घ्यावा - पृथ्वीराज चव्हाण

साखरवाडी, ता. १९ - न्यू फलटण शुगर वर्क्‍स कामगार, शेतकऱ्यांच्या मदतीने गाळपास सज्ज झाला असून, हा आदर्श इतर कारखान्यांनी स्वीकारावा, असे आवाहन पंतप्रधान कार्यालय राज्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.येथील न्यू फलटण शुगर वर्क्‍सच्या ७६ व्या गळीत हंगाम प्रारंभप्रसंगी श्री. चव्हाण बोलत होते. अध्यक्षस्थानी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हिंदूराव नाईक - निंबाळकर होते. या वेळी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आनंदराव पाटील, उद्योगपती माधवराव आपटे, विक्रम आपटे, महाराष्ट्र राज्य कामगार प्रतिनिधी परिषद मंडळाचे अध्यक्ष बी. आर. पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य अविनाश धायगुडे, विजयसिंह भोसले, धोंडिराम वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते. श्री. चव्हाण म्हणाले, ""लहान कारखान्यांना मोठ्या कारखान्यांशी स्पर्धा करणे अवघड आहे. जुन्या छोट्या कारखान्यांना महाराष्ट्र शासनाने विशेष सवलती दिल्या पाहिजेत. "न्यू फलटण'ने शेतकरी, कामगार एकत्र येऊन एखादी संस्था चालवू शकतात याचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे.''

प्रल्हादराव साळुंखे- पाटील म्हणाले, ""क्षमतेने लहान, जुनी मशिनरी असलेला कारखाना शासन व बॅंकेच्या कोणत्याही मदतीशिवाय कामगार, शेतकरी व्यवस्थापकांच्या मदतीने चालवण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. येत्या गळीत हंगामातही तो यशस्वी चालवण्याचा निर्धार आम्ही केला आहे. त्यात निश्‍चित यश मिळेल. नीरा खोऱ्यातील इतर मोठ्या कारखान्यांप्रमाणे किंवा शासनाने ठरवून दिलेल्याप्रमाणे पहिला हप्ता देण्याची तयारी आहे.'' कारखान्याला अबकारी करातून राज्य सरकारकडून सवलत मिळावी, अशी मागणी या वेळी त्यांनी मंत्री चव्हाण यांच्याकडे केली.

या वेळी अध्यक्ष हंबीरराव भोसले, संचालक श्‍यामराव भोसले, बाबूराव काकडे, राजेंद्र शेलार, लोणंदच्या सरपंच सौ. डोईफोडे, कारखान्यातील अधिकारी, कामगार, शेतकरी आदी उपस्थित होते.