निंभोरे, ता. २२ - छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांची विटंबना झाल्याचे निदर्शनास येताच फलटण शहरात आज तणावाचे वातावरण निर्माण झाले. संतप्त जमावाने दगडफेक केली. सुमारे पंधरा एसटी बस फोडल्या. शहरात उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला. दुपारनंतर तणाव निवळला; पण तत्पूर्वी अनेकांची गैरसोय झाली.
एसटीवर दगडफेक सुरू झाल्याने काही काळ एसटी वाहतूक बंद ठेवण्यात आली. रविवारी बाजारचा दिवस असल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले. एसटीवरील दगडफेकीत तीन प्रवासी किरकोळ जखमी झाले. पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आल्यानंतर दुपारी १२ नंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली.
रविवारचा दिवस असल्याने या घटनेमुळे आठवडा बाजार पूर्णपणे विस्कळित झाला. दुकानदारांनी उत्स्फूर्तपणे दुकाने बंद ठेवली होती. उमाजी नाईक पुतळ्याजवळ बसलेल्या भाजीविक्रेत्यांना हुसकावून लावण्याचा प्रकार घडला. त्याठिकाणी पोलिस वेळीच पोचले. या घटनेचे पडसाद तरडगाव व वाठार स्टेशन येथे उमटले. तरडगाव येथे रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महाड- पंढरपूर रस्त्यावर अर्धा तास "रास्ता रोको' केला. या आंदोलनामुळे दोन्ही बाजूकडे वाहने मोठ्या प्रमाणावर खोळंबली होती. विटंबनेचे वृत्त पसरताच सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते जमावाने फलटणमधील शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात जमा झाले. घटनेचा तीव्र निषेध करून समाजकंटकांना अटक करण्याची मागणी केली. त्याचबरोबर शहरात सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले.
तहसीलदार हिम्मतराव खराडे, पोलिस उपअधीक्षक वसंतराव जाधव, पोलिस निरीक्षक अनिल कदम फौजफाट्यासह आंबेडकर चौकात आले. नगराध्यक्षा नंदा अहिवळे, उपाध्यक्ष सुनील मठपती, शिवसेनेचे तालुकाप्रमुख ऍड. नरसिंह निकम, शहर प्रमुख प्रशांत बावळे, नागेशराव भोसले पाटील, समता परिषदेचे दशरथ फुले, दलितमित्र बेबीताई कांबळे, मोहनराव काटकर (गुरुजी), अशोकराव भोसले, अमीरखान मेटकरी, मनसेचे युवराज शिंदे, विराज खराडे, रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष मुन्ना शेख, शहराध्यक्ष गणेश अहिवळे, बी. टी. जावळे (गुरुजी), संजय निकाळजे, विजय येवले यांच्यासह असंख्य कार्यकर्ते जमा झाले. या सर्वांनी या घटनेचा निषेध करून समाजकंटकांना अटक करण्याची मागणी केली. शहरातील पुतळ्याच्या संरक्षणाकरता उपाययोजना करावी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.
पोलिस उपअधीक्षक वसंतराव जाधव यांनी समाजकंटकांचा त्वरेने शोध घेण्याची ग्वाही दिली. त्याचबरोबर रात्री आठ ते सकाळी सहा वाजेपर्यंत प्रत्येक पुतळ्याला पोलिस संरक्षण देण्यात येईल, असे सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास नगराध्यक्षा सौ. नंदा अहिवळे, वसंतराव जाधव, बेबीताई कांबळे, दशरथ फुले आदींनी पुष्पहार अर्पण केले. बौद्ध प्रार्थनेनंतर सर्व जमाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी गेला. शिवसेनेचे तालुकाध्यक्ष ऍड. नरसिंह निकम, नागेशराव भोसले- पाटील, प्रशासनातील अधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण केले. वसंतराव जाधव, हिम्मतराव खराडे, नागेशराव भोसले पाटील, अशोकराव भोसले, सुनील मठपती यांनी नागरिकांना शांतता राखून कोणताही बंद न पाळता शहरातील व्यवहार सुरू करण्याचे आवाहन केले. राष्ट्रगीतानंतर येथील जमाव पांगला.
जिल्हाधिकारी विकास देशमुख व जिल्हा पोलिस अधीक्षक प्रकाश मुत्याल यांनी दुपारी एक वाजता फलटणला भेट दिली. परिस्थितीचा आढावा घेऊन शांतता समितीच्या सदस्यांसमवेत बैठक घेतली. शहरात शांतता, सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांनी आवाहन केले.
फलटणमधील प्रकार दुर्दैवी असून, भीमशक्ती व शिवशक्तीच्या कार्यकर्त्यांमध्ये बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांकडून अशा प्रकारे होत आहे. उभय गटाच्या कार्यकर्त्यांनी शांतता राखावी. तणावपूर्ण भूमिकेतून जनतेचेच नुकसान होते. त्यामुळे संयम बाळगणे महत्त्वाचे आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पवार यांनी व्यक्त केली.
--------------------------------------------------------
साताऱ्यात पडसाद सातारा - या घटनेचे साताऱ्यातही पडसाद उमटले. भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मुख्य बस स्थानकासमोर "रास्ता रोको' केला. करंजे परिसरात एक एसटी बस फोडण्यात आली. "रास्ता रोको'मुळे पोवई नाका व हुतात्मा स्मारकापर्यंत गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारी अडीचच्या सुमारास करंजे परिसरातील टीसीपीसी कार्यालयासमोर मुंबई- राधानगरी बसच्या काचा फोडण्यात आल्या. दुचाकीवरून आलेल्या चार अनोळखी युवकांनी गाडी थांबवून चालकाला खाली उतरवले आणि नंतर काठीने एसटी बसच्या दोन्ही काचा फोडल्या.
--------------------------------------------------------
Sunday, June 22, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment